‘देवेंद्र फडणवीस तुमच्या नाकावर टिच्चून लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील’

मुंबई:- महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले असून सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. 

शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, राज्यसभा खासदार नारायण राणे यांची 22 वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीही जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.दरम्यान, मलिक यांच्या टीकेला भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. 

‘नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहेत. तुमच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीसजी लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील. कारण ते त्यांचं नाही तर जनतेचं स्वप्न आहे. जनतेने त्यांच्याच नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केला होता. पण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा ‘अल्प मंत्री’ असलेल्या आपण बहु चिंता करु नये’, अशी टीका भोसले यांनी केली आहे.

टिप्पण्या