अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई

पिंपरी : काहींनी पै-पै साठवून लाखो रुपये जमवून तर, काहींनी गावाकडची जागा व शेती विकून स्वप्नातील घरासाठी शहरात जागा घेतली. त्यावर पक्के घर बांधले, काहींनी तात्पुरते पत्राशेड उभारून निवारा साकारला. राहायला आले. 

पण, सोमवारी (ता. 8) महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करून सर्व भुईसपाट केले. कारण, सर्व बांधकामे अनधिकृत व रेडझोन हद्दीत होती. कारवाईमुळे रहिवाशांना कळले की, जागा घेताना आपली फसवणूक झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामापासून वडमुखवाडी रस्त्यालगत (खाणींचा रस्ता) हाकेच्या अंतरावर मोकळ्या माळरानात अनेकांनी प्लॉटिंग केले आहे.

 सिमेंटचे खांब रोवून व तारेचे कुंपण करून अर्धा, एक व दोन गुंठ्याचे प्लॉट आखले आहेत. त्यातील बहुतांश प्लॉट विकले आहेत. काहींनी पक्के तर काहींनी अँगल व पत्रा लावून बांधकाम केले आहे. अनेक जण राहायला आले आहेत. काही प्लॉटिंगमध्ये वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहेत. काही ठिकाणी कंटेनर व अन्य वाहनांसाठी पार्किंग सुविधा आहे. 

त्यासाठी केबिन उभारले आहेत. अशा सर्व बांधकामांवर सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार व पोलिस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. बुलडोझरच्या साह्याने बांधकामे पाडली. तत्पूर्वी, काही नागरिकांनी घरांमधील साहित्य बाहेर काढले.

 'त्या'चा बंगलाही पाडला 

रेडझोनमधील जागा विकणाऱ्या व्यक्तीने रस्त्यालगतच सुमारे दहा गुंठे जागेत आलिशान बंगला बांधला होता. संरक्षक भिंत उभारून शोभेची झाडे लावली होती. त्या बंगल्यावरही कारवाई करण्यात आली. संरक्षक भिंत व बंगल्याच्या आवारातील कॉंक्रिट काढेपर्यंत त्याने सर्व साहित्य बंगल्याबाहेर काढले. 

राजकारण्यांचे 'हात' वर 

कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काही नागरिकांनी नगरसेवक व राजकीय पदाधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, "सरकारच्या आदेशानुसार कारवाई होत आहे, कोणीच थांबवू शकणार नाही,' असे म्हणून त्यांनी "हात' वर केल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्लॉट विक्रीची कार्यालये 
महामार्गावरील राजे शिवछत्रपती चौक (वखार महामंडळ चौक) ते वडमुखवाडी रस्त्यालगत "प्लॉट विक्री सुरू आहे,' अशा आशयाचे बोर्ड लागलेले असून त्यासाठी कार्यालयेही थाटलेली आहेत. कारवाई सुरू असताना "या' कार्यालयांमध्ये काही मध्यस्थ बसून होते. अशा कार्यालयांवरही कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. 

फसवणुकीसाठी बनवाबनवी 
रेडझोनमधील जागा विक्री करताना प्लॉटिंग करण्यात आले. प्रत्येक प्लॉटला तारेचे कुंपण आखले. खडी व डांबर टाकून रस्ता केला. मुख्य रस्त्यापासून शेवटच्या प्लॉटपर्यंत भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकल्या. त्यांचे चेंबर्स ठेवले. बांधकाम झालेल्या घरांमधील सांडपाण्याचे पाइप चेंबरला जोडले. 

घराघरांमध्ये वीजपुरवठा देण्यासाठी जागोजागी विद्युत बॉक्‍स बसविले. रस्त्याच्या कडेला खांब उभे करून दिवे बसविले. पाणीपुरवठ्याचे पाइप टाकले. स्वतःचे घर सुरुवातीला बांधले. इतके सर्व पाहून गरजवंत भुलले आणि दहा ते अकरा लाख गुंठ्याप्रमाणे काहींनी गुंठा, अर्धा गुंठा जागा घेतली. त्याच्या खरेदी खर्चापोटी 80 हजार रुपये वेगळे दिले. त्यानंतर त्याने जागेचा सात-बारा व अन्य उतारे दिले. त्यामुळे नागरिकांचा विश्‍वास बसला. या भागात जागा घेतलेले बहुतांश नागरिक बीड, उस्मानाबाद, परभणी आदी भागातील आहेत. 

एकमेकाच्या ओळखीने व सांगण्यावर त्यांनी जागा घेतल्याचे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले. मात्र, भीतीपोटी कोणीही स्वतःचे नाव सांगण्यास तयार नव्हते. मी बांगड्या विकून घर चालवते. गावाकडची अडीच एकर जागा विकून पाच लाख 60 हजार रुपयांना अर्धा गुंठा जागा घेतली. साडेतीन लाख रुपये देऊन बांधकाम केले. पुढच्या महिन्यात राहायला येणार होते, असे चाळिशीतील महिलेने सांगितले. बिगारी काम करून पैसे साठवले होते. साडेपाच लाख घालवून जागा घेतली. 

पत्राशेड उभारून राहायला आलो. आठ दिवस झाले पोरगं चप्पल मागतोय, त्याला चप्पल घेऊन देऊ शकलो नाही, अशी व्यथा बिगारी कामगाराने मांडली. कारवाई सुरू असताना तीन महिन्यांचे बाळ घेऊन एक महिला घराबाहेर आली. छोट्याशा रोपट्याला झोका बांधून त्याला झोपवत होती. "भंगार गोळा करून पैसे गोळा केले होते. राहायला येऊन दोनच महिने झाले,' असे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. फसवणुकीचे गुन्हे दाखल करा 
नागरिकांची फसवणूक करून जागा विकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करा. केवळ फसवणूकच नाही, तर बनावट कागदपत्रे करणे, अतिक्रमण करणे असे गुन्हेही दाखल करा, अशी सूचना पोलिस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांना केली. 
 

टिप्पण्या