सचिनचा भारतरत्न परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
मुंबई : भारतातील शेतकरी आंदोलनाने सध्या अवघ्या जगाचे लक्ष वेधलेले आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला दर्शवलेल्या पाठिंब्यानंतर केंद्र सरकारच्या बचावासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे आला. परंतु सचिनने केलेल्या ट्वीटनंतर अनेकांची निराशा झाली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा सोडून सचिन हे काय म्हणतोय, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
आता संभाजी ब्रिगेडने एक पाऊल पुढे जात सचिनकडून भारतरत्न परत घेण्याची मागणी केली आहे. ज्या सचिनने आपल्या खेळामुळे संबंध देशवासीयांची मने जिंकली, त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर शेतकऱ्यांनी पेरलेच नाही, तर सेलिब्रिटी काय खातील? असा प्रश्नही यावेळी संभाजी ब्रिगेडने विचारला आहे.संभाजी ब्रिगेडने आरोप केलाय की, मागचे 70-71 दिवस झोपलेला सचिन आता अचानक जागा कसा झाला आहे. राज्यसभेत खासदार असताना त्यांनी सभागृहात हजेरी नोंदविलेली नाही.
साधा एक प्रश्नही विचारलेला नाही आणि आता शेतकरी आंदोलनावर भाष्य करत आहेत. सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्यायला. परंतु उलट शेतकरी आंदोलनकांविरुद्ध त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांचा भारतरत्न परत घेण्यात यावा. अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी सचिन तेंडुलकरवर आरोप केले आहेत.दिल्लीत गाझीपूर सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पूर्वाश्रमीची एडल्ट स्टार मिया खलिफा यांनी ट्वीट केले.
या प्रतिक्रियांना उत्तर देताना सचिन तेंडुलकरनेही ट्वीट केले. सचिनने लिहिले की, ‘भारतीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतात घडणाऱ्या घटनांसाठी देशाबाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, परंतु त्यांना यादरम्यान हस्तक्षेप करण्याची गरज नाही. येथील नागरिकांना भारतासाठी काय चांगलं आहे उमगलं आहे, आणि त्यांना तो तोडगा नक्कीच सापडेल. देशाने एकजूट दाखवली पाहिजे.
टिप्पण्या