‘फडणवीसांना हिंदुंचा एवढाच कळवळा, तर मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही’?
पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली. त्यानंतर शरजिल उस्मानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती.
यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय.
देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय.
टिप्पण्या