दुर्दैवी ! मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू, सासरा व सुनेचा कारच्या धडकेत मृत्यू
लोणंद – लोणंद-खंडाळा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांना एका वाहनाने गुरुवारी सकाळी शेळके वस्तीजवळ धडक दिली.
या अपघातात बबन नाना धायगुडे (वय 70) व त्यांची पत्नी शांताबाई (वय 60) हे दोन जण जागीच ठार झाले, तर त्यांची सून सारिका भगवान धायगुडे (वय 35) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले; परंतु त्या वाहनाचा बंपर व नंबर प्लेट घटनास्थळी पडला होता.
या नंबर प्लेटवरून पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.याबाबत माहिती अशी, लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीतील जवळील घाडगे मळ्यानजीक आज (गुरुवार) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बबन धायगुडे, सौ. शांताबाई धायगुडे (वय 60) व सारिका भगवान धायगुडे (वय 35) हे तिघे मॉर्निंग वॉकला निघाले होते.
घरापासून काही मीटर अंतर खंडाळा बाजूकडे चालत गेल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कारने अचानक समोरून तिघांना जोरदार धडक दिली.या अपघातात बबन व शांताबाई धायगुडे हे दाम्पत्य जागीच ठार झाले. त्यांची सून सौ. सारिका धायगुडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सौ. सारिका यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
तेथे उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले.घटनास्थळी वाहनाचा बंपर व नंबर प्लेट (एमएच-20-बीके-9428) आढळली. त्यावरून पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत.
हे वाहन लोणंदच्या दिशेने निघून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. सपोनि संतोष चौधरी तपास करत आहेत...
#punenews24 #punekar #brekingnews
#maharshtraupdate
टिप्पण्या