‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो.’

पुणे: यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं. तर शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देखील नाकारली होती. डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.दरम्यान, मोठ्या संघर्षानंतर शनिवारी पुण्यातील स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंदिरात एल्गार परिषद पार पडली. या पार्श्वभूमीवरमोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी 30 जानेवारीला परिषद घेण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार ही परिषद पार पडली.

यावेळी आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय परिषदेत बोलत असताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची तोफ डागली. ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही व पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात ‘एल्गार’ करण्याची गरज असून ‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत; मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ मदत करतात, त्यामुळे कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत.’


 
‘दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके तातडीने मागे घेतली जावीत. आपल्याकडे राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जाते. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी अटक केलेल्या सर्वांना त्वरित मुक्त केले जावे. अशी मागणी त्यांनी केली.

‘जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स (एसएसआर) अर्थात द्वेष विरुद्ध प्रेमाची लढाई उभी करावी लागेल.’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


 
महत्वाच्या बातम्या 

टिप्पण्या