ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी #FarmLaws #FarmersProtest #Police
नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ठिकठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. रॅलीचा मार्गसोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत दिलेली धडक तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे.
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याच दरम्यान आता लाल किल्ल्यावरील घटनेनंतर 100 आंदोलक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर जवळपास 100 हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर 18 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 18 पैकी सात जण पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील आहेत. अटक झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी 23 जानेवारी रोजी निघाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब ह्यूमन राइट्स ऑर्गेनायजेशन नावाच्या एका एनजीओने हा दावा केला आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिनासाठी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. यातील जवळपास 100 आंदोलक शेतकरी गायब झाले आहेत. पंजाब ह्यूमन राइट्स ऑर्गेनायजेशन शिवाय दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, खालरा मिशन, पंथी तालमेल संघटना यांचासह विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे.दिल्लीच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगाच्या 11 आंदोलकांना नांगलोई पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांची आता तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूर आणि नरेला भागात देखील अटकसत्र राबवण्यात आलं. मनजिंदर सिंह सिरसा यांनी जखमी आंदोलक शेतकऱ्यांना सेंट स्टीफन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टिप्पण्या